रोजच्या कंटाळवाण्या रुटीन लाईफ मधून सुट्टीचे निवांत क्षण सापडताच निसर्गवेड्या पर्यटकाला लागतात ते भटकंतीचे वेध.
दूरवर पसरलेले निळेशार भासणारे डोंगर आणि दऱ्या, समोरून येणारे दाट धुके, मनाला सुखाविणारा हवेतील गारवा, मधूनच अंगावर पडणारी सूर्याची कोवळी किरणे, सभोवताली ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, बाजूनेच खळखळ करत वाहणारी नदी.............. असे मंत्रमुग्ध करणारे वातावरण एन्जॉय करताना आपला स्ट्रेस कधी दूर झालाय हे आपल्याला कळत देखील नाही.
उन्हाळ्याची सुट्टी आणि पर्यटनस्थळे यांचे समीकरण पक्के असताना मात्र गेल्या काही वर्षांपासून याला जागतिक मंदीचा तडाखा बसला आणि त्यास दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट मालिकांची जोड मिळाली. या सर्वांचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला. परदेशी पर्यटकांनी, त्यांच्या वकिलातीने भारतात न जाण्याच्या इशाऱ्याने आपला भारत दौरा रद्द केला तर आपल्या पर्यटकांनी थोडी सबुरी बाळगून काही कालावधीनंतर सहलीवर जाण्याचे ठरविले. त्यामुळे आपल्याकडील लोकप्रिय पर्यटनस्थळांवरील गर्दी रोडावत गेली. नाही म्हणायला एखादा लाँग वीकेंड आला तर आपला दर्दी पर्यटक, आपल्या व्यस्त जीवनक्रमाला थोडेसे बाजूला सारून, दोन- चार दिवसांकरता जवळपासच्याच ठिकाणी जावून दुधाची तहान ताकावर भागवत होता.
पाहता पाहता २०१० साल सुरु झाले ते मंदीचे मळभ दूर होऊ लागलेय या शुभवार्तेसह. अचानक गेल्या दोन- तीन वर्षांमध्ये पर्यटनक्षेत्रामध्ये जी मरगळ आलेली होती ती दूर होताना दिसतेय. सहल आयोजकांकडे आता आपल्या उन्हाळी सुट्टीचे नियोजन करवून घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळू लागलेली दिसतेय. त्यांच्याकडील फोन सतत घणघणु लागलेले आहेत आणि ई-मेल ने त्यांचे मेल बॉक्स भरून जात आहेत.
रेल्वेचे आगाऊ आरक्षण ९० दिवस आधी सुरु होत असल्यामुळे आधी ते करवून घेण्याकडे पर्यटकांचा कल आहे. रेल्वे आरक्षण करताना असे समजले कि आरक्षण फुल झालेय आणि भली मोठी वेटिंग लिस्ट दिसतेय तर आता तत्काळ तिकिटासाठी २ दिवस आधी वाट बघण्याची किंवा सहलीचा बेत रद्द करण्याची गरज नाही कारण आता आपल्याकडे विमान प्रवास करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. विमान कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे आता त्यांच्यामध्ये "किंमत युद्ध" सुरु झालेय आणि कमीत कमी दरात तिकिटे उपलब्ध होत आहेत. मुंबई ते दिल्ली हा विमानप्रवास तर अडीच- तीन हजारच्या घरात आलाय. त्यामुळे कमीत कमी वेळेत, कमी तिकीट दरात, आरामदायी प्रवास करण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे काही पर्यटक तर हल्ली चक्क रेल्वे आरक्षणाला पहिली पसंती देण्याऐवजी विमान प्रवासाला देत असल्याचे चित्र दिसू लागलेय.
अनेक सहल आयोजकांनी निरनिराळ्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी विविध आकर्षक पेकेजेस आखली आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे बरेच सहल आयोजक कमी सहल खर्चात आरामदायी आणि झकास अश्या पैसे पुरेपूर वसूल करणाऱ्या सहली करण्याच्या ऑफर्स देत आहेत. अगदी भारतीय रेल्वेचा उपक्रम असणाऱ्या आय.आर.सी.टी.सी. ने देखील यामध्ये प्रवेश केलाय आणि कमी सहल खर्चात रेल्वे प्रवासासह सहली आयोजित करणे सुरु केलेय.
सध्या उन्हाळी सुट्टीसाठी पर्यटकांची पसंती हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख तसेच दक्षिणेकडील उटी- कोडाईकनाल- मुन्नार- येरकोड ला मिळतेय. थोडे लांब असले तरी निसर्गरमणीय असल्याने काही जण दार्जीलिंग- सिक्कीम ला देखील जायचे ठरवत आहेत. काही दिवसांमध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु झाल्यामुळे या सगळ्यांमध्ये काश्मीर मात्र काहीसे मागे पडताना दिसतेय.
अशा उत्साहपूर्ण वातावरणात पर्यटन क्षेत्राचा 'कुंभमेळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी. टी. एफ. हा तीन दिवसीय पर्यटन मेळा वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेस येथे नुकताच पार पडला. या मेळ्यासाठी संपूर्ण भारतातून तसेच परदेशातून नामांकित हॉटेल्स आणि तेथील पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी मुंबईत आले होते. या मेळ्यामध्ये मुंबईतील सहल आयोजकांना तसेच पर्यटकांना त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून त्यांच्या प्रदेशातील पर्यटन आणि स्थळदर्शन याविषयी अधिक माहिती प्राप्त झाली तसेच तेथील नवीन प्रेक्षणीय ठिकाणांविषयी अधिक जाणून घेता आले.
चला तर मग.... पर्यटनातील आनंद अनुभवायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. ही चालून आलेली सुवर्णसंधी दवडू नका. रोजचा कामाचा व्याप, चिंता, व्यग्र जीवनक्रम सगळे सगळे विसरून जा आणि निसर्गाच्या कुशीत शिरायला तयार व्हा.
रेडी? गेट सेट गो..........
शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा