शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१०

युवराज

तो आला... त्याने पाहिले... आणि तो जिंकला.... असेच काहीसे राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीबाबत आपल्याला म्हणता येईल. वाद- प्रतिवाद यांच्या उडालेल्या धुराळ्यात राहुल गांधी यांचा मुंबई दौरा यशस्वी झाल्याचे चित्र दिसले. परंतु आपले राज्यकर्ते दिल्लीश्वरांसमोर किती आणि कसे लाजिरवाण्या पद्धतीने झुकतात हे देखील सगळ्या जनतेने पाहिले. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे प्रश्न न सोडवता आपली सगळी कामे सोडून आपल्या पक्षाच्या सरचिटणीस यांच्या समोर कसे लाजीरवाण्यासारखे दिवसभर बसून होते हे देखील दर्शन घडले. जनतेने आपल्याला त्यांच्या समस्या सोडवण्याकरता निवडून दिल्याचेही भान त्यांना राहिलेले दिसत नव्हते. आपल्या राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांनी तर राहुल गांधी यांचे जोडे उचलून आपल्या हुजरेगिरीचे दर्शन घडवले.

खरे पाहता या दौरयाला इतके महत्व देण्याची मुळीच गरज नव्हती पण शिवसेनेने दिलेले आव्हान बघून मग सरकारला पण स्फुरण चढले आणि आपल्या करदात्याच्या पैशांचा चुराडा करण्यात आला. जणू काही राज्याच्या सगळ्या समस्या- प्रश्न अगदी सगळे संपले असल्यासारख्या थाटात सरकारी मंडळी वावरत होती.

आपण जर नीट बघितले कि आपल्याला असे लक्षात येईल कि गेली २-३ वर्ष अगदी ठरवून राहुल गांधी यांच्यासाठी मार्केटिंग केले जातेय अर्थात हे सर्व सत्तारोहण करण्याच्या दिशेनेच उचललेली पावले आहेत. आता खरे तर मनमोहन सिंग यांच्यासाठी धोक्याचीच घंटा वाजायला लागलेली आहे. फारफार तर २ वर्षांमध्ये राहुल गांधी यांचे पंतप्रधान बनणे निश्चित आहे.

मध्यंतरी राहुल गांधी यांनी दिल्ली मध्ये मेट्रो रेल्वे ने प्रवास केला आणि लगेच त्याची बातमी झाली. आपण अतिशय साधे आहोत आणि आपल्यायला सर्व सामान्यांच्या प्रश्नांविषयी जाण आहे आणि त्याबद्दल आपल्याला काहीतरी ठोस करायचे आहे असे ते सतत भासवत असतात. अशाच तऱ्हेने त्यांनी मध्यंतरी विदर्भातल्या कलावती यांची भेट घेतली आणि त्या संबंधी लोकसभेत भाष्य केले आणि शेतकऱ्यांच्या आत्म्हत्यांविषयी आपल्याला किती हळहळ वाटते हे त्यांनी दाखवून दिले.

काही दिवसांपूर्वी बिहार येथील एका सभेत बोलताना त्यांनी मुंबईला बिहारी आणि उत्तर प्रदेशातील कमांडोनी वाचवले असे एक धक्कादायक विधान केले. आणि त्यांना काही दिवसानंतर मुंबईत जायचे आहे हे पक्के माहित होते पण तरीदेखील त्यांनी हे जाणून बुजून हे विधान केले असावे कारण त्यामुळे आपण आणि प्रसिद्धीच्या शिखरावर जावून पोहोचणार आहोत याची त्यांना खात्री होती. ह्या सगळ्या चाली ते अगदी बुद्धिबळातील पट समोर रचून ठेवल्यासारख्या खेळतात आणि त्याचे निश्चित परिणाम काय होतील हे त्यांना पक्के माहिती असते. आपण केलेल्या विधानाची काय प्रतिक्रिया उमटेल हे त्यांना पुरेपूर माहिती होते आणि महाराष्ट्रात आपलीच सत्ता असल्यामुळे आणि शिवसेना आता पूर्वीसारखी भेदक राहिली नसल्यामुळे आपला दौरा सुरळीतपणे पार पडून आपण देशवासीयांच्या मनात हिरो बनू हा त्यांचा अंदाज होता आणि तो खरा ठरला देखील.

भाईदास सभागृहातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अचानक त्यांनी अंधेरी स्टेशन गाठले आणि तिथल्या एका ए.टी.एम. मधून पैसे काढले आणि रांगेत उभे राहून अंधेरी ते घाटकोपर वाया दादर असे तिकीट काढले आणि लोकलने त्यांनी तो प्रवास केला (त्यांनी एकट्याचेच तिकीट काढले आणि बाकीच्या जणांनी तो प्रवास फुकटच केला. हे वरकरणी अचानक झाले असे दर्शविले असले तरी तसे ते नसावे. या प्रवासाची संपूर्ण कल्पना स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप च्या कमांडोंना असलीच पाहिजे नाहीतर त्यांनी हा प्रवास होऊनच दिला नसता. हा स्टंट राहुल गांधी यांनी लोकप्रिय होण्यासाठीच केला.

जणू काही आभाळच कोसळलेय अश्या थाटात सर्व पोलीस दलास बंदोबस्ताच्या कामास जुंपले गेले. लोकशाहीमधील निषेध करण्याचाही अधिकार डावलला गेला. संपूर्ण सरकार अगदी लाचार झाल्यासारखे वाटत होते. यामुळे संपूर्ण दिवसभर सर्वसामान्य करदात्या जनतेस खूपच त्रास सहन करावा लागला. पण काय करणार? 'आले युवराजांच्या मना.... तिथे कोणाचेच चालेना'

आता फक्त तारीख आणि मुहूर्त काढणेच शिल्लक आहे... बाकी युवराजांचा राज्याभिषेक होणे नक्की झालेय......

काउंटडाउन तर कधीचेच सुरु झालेय.......

1 टिप्पणी:

  1. far chukichya paddhatine sarva chalu aahe. kadhi kadhi khoop raag yeto....vatate ata krantichi vel najik yet aahe. Don diggaj nete kashasathi bhetatat tar cricket ya muddyavar. Deshatil janatene cricket pahile tar tyanchi pani, anna, nivara, vastra, mahagai, dahashatvaad asha samasy antun sutaka hoeil ki kay ?

    Pratyekala apli poli bhajun ghyayachi aahe. Asech chalu rahile tar lokanchya santapacha udrek lavkarach honar he nakki.....kranti..kranti..kranti

    उत्तर द्याहटवा