मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०

अनाम प्रेम......

आपल्या मुंबईकरांचे रोजचे आयुष्य खूप धावपळीचे असते. आपण जणू स्वतःला घड्याळ्याच्या काट्यालाच बांधून घेतलेले असते. सकाळी लवकर उठायचे म्हणून आपण सहा वाजताचा गजर लावून ठेवतो. सकाळी ठरल्या वेळेला गजर वाजतो आणि तो आपण सवयीप्रमाणे हात लांब नेऊन बंद करून टाकतो आणि मग झोपेतच विचार करतो (झोपेत विचार फक्त मुंबईकरच करू शकतो हा...) कि आणखी पाच ते दहा मिनिटे झोप काढू आणि तसेच झोपून जातो आणि आपल्याला जेव्हा जाग येते तेव्हा ७ वाजलेले असतात आणि मग सुरु होते ती धावपळ. डोळ्यासमोर ९.१७ ची गाडी दिसत असते आणि आपल्याला नक्की काय करावे तेच सुचत नसते. घाईघाईत आपण सगळे आवरतो आणि मग स्टेशन च्या दिशेने पळत सुटतो. उपनगरामध्ये रहात असल्यामुळे स्टेशन ला जाण्यासाठी आपण रिक्षा करतो. खूपच उशीर झाला तर मग स्वतंत्र रिक्षा नाहीतर मग शेअर रिक्षा.
एक दिवस असाच मला उशीर झाला होता. घाईघाईतच मी रिक्षा पकडली. आधीचे ३-४ रिक्षावाले नेहेमीच्या सवयीप्रमाणे यायलाच तयार नव्हते शेवटी एक यायला तयार झाला. मी रिक्षात बसलो आणि रिक्षा स्टेशन च्या दिशेने निघाली. सहज समोर माझी नजर गेली. रिक्षावाल्याच्या सीट च्या मागे एक स्टीकर चिकटवला होता. त्या स्टीकर वर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते ' अनाम प्रेम'.

मी उत्सुकतेने पुढे वाचायला सुरुवात केली. त्या स्टीकर वर काही मजकूर होता. त्यावर असे लिहिलेले होते कि मी प्रतिज्ञा करतो कि ' रिक्षावाल्याला अरे असे न म्हणता अहो असे म्हणून मी हाक मारीन, रिक्षातून खाली उतरताना रिक्षाचालकाला धन्यवाद असे म्हणेन, पैशांच्या देवाण- घेवाण करताना होणाऱ्या शुल्लक (?) वादात पडणार नाही. कटू गोष्टींचा त्याग करीन आणि सदैव चांगलेच बोलीन... इत्यादी इत्यादी. तो स्टीकर वाचत असतानाच मला अचानक तंद्री लागली. आणि मला अचानक सर्वच रिक्षाचालक मला अतिशय सौजन्याने प्रवाश्यांशी वागताना दिसू लागले. ते अतिशय स्वच्छ गणवेशात प्रवाश्यांशी हसून आलेले भाडे न नाकारता त्यांच्या इच्छित स्थळी नेत असल्याचे दृश्य दिसू लागले. आपली रिक्षा अगदी वाहतुकीचे सर्व नियम पाळून आतल्या प्रवाश्याला अजिबात त्रास न होता मुखी नामस्मरण करत चालवताना दिसायला लागले. प्रवास संपल्यावर मीटर प्रमाणे अगदी अचूक भाडे घेताना दिसू लागले आणि प्रवाश्यांना उरलेले सुट्टे पैसे अगदी हसतमुखाने देऊन त्यांना शुभेच्छा देत असल्याचे दिसू लागले. आणि अचानक एका मोठ्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. बघतो तर काय मी ज्या रिक्षामध्ये बसलेलो होतो त्याने अगदी कोणीतरी मध्ये आल्याने (त्याच्या भाषेत कोणीतरी तडमडले) अगदी करकचून ब्रेक मारला होता. माझ्या रिक्षाचा चालक त्या व्यक्तीच्या अगदी दणदणीत उद्धार करत होता आणि मधूनच पानाची पिचकारी मारून रस्त्याला शोभा आणत होता. शेवटी एकदाची त्याने माझी रिक्षा पुढे नेली. मी रिक्षातून उतरताना १० रुपयांची नोट त्याला दिली कारण रिक्षाभाडे ९ रुपये झाले होते आणि त्याच्याकडे द्यायला १ रुपया नव्हता (विश्वास बसेल?). लोकलची वेळ झालेली होती त्यामुळे मला त्यावर पाणी सोडून द्यावे लागले. काय करणार मग?

प्लेटफोर्म वर जात असताना माझ्या मनात बराच वेळ अनाम प्रेम हा विषय घोळत होता. अचानक माझ्या मनात एक विचार चमकून गेला कि याला खरच अनाम प्रेम म्हणावे का? हि हे एकतर्फी प्रेम आहे? कारण रिक्षाचालकांशी कसे वागावे, कसे बोलावे याविषयी फक्त आपल्यासारख्या प्रवाश्यांनाच उपदेशाचे बोध पाजण्यात आलेले आहेत आणि रिक्षाचालकांना? त्यांना हे लागू नाही का? मग हे अनाम प्रेम कसे होईल? हे तर एकतर्फीच प्रेम झाले ना?

तुम्हीच सांगा कि तुम्हाला काय वाटते?

३ टिप्पण्या:

 1. योगेश मस्तच यार !!! मीडियावर काही तरी लिही ना ..,
  कारण त्याच दिवशी राहुल गान्धीला रामाबाई अम्बेडकर नगरात ५ शिवासैनिकानी झेंड़े दखावाले होते .
  ना त्याची काही बतामी ना दृश्य , मीडिया पण मस्तावालय pls कही तरी लिही.
  तू माझा मित्र असल्याचा मला गर्व आहे keep it up

  PRAMOD VANJARE

  उत्तर द्याहटवा
 2. गुर्जी लय भारी..... विषय बरेच आहेत रे लिहायाला.... पन मग तु आपल्या travel industry पासुनच सुरवात का नाही करत रे ? इथल्या अप-प्रव्रुतीं बद्दल पन लिही.... साफ सफाईला सुरुवात घर पसुन व्हायला हवी ना ? वाट बघतेय नविन topic ची..

  उत्तर द्याहटवा